Translate

Friday, February 22, 2019

@ ज्ञानेश्वरी @अध्याय १ला अर्जुनविषादयोगः-ओवी क्र :- ४१ ते ६०

卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ४१ ते ५०* 🌹
     

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁


ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे ।
तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥ ४१ ॥

कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी ।
प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥ ४२ ॥

ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे ।
आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥ ४३ ॥

नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण ।
मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥ ४४ ॥

तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें ।
तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥ ४५ ॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं ।
पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥ ४६ ॥

म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं ।
येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥ ४७ ॥

ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था ।
मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥ ४८ ॥

जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम ।
परम मंगलधाम । अवधारिजो ॥ ४९ ॥

आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु ।
जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥ ५० ॥

      🍁🍁 *मराठी अर्थ*🍁🍁


  *ज्याप्रमाणे*नगरात राहिल्यावर मानवास शहाणपण प्राप्त होते, त्या प्रमाणे व्यासांच्या सात्विक वाणीच्या तेजामुळे सर्व जग ज्ञानसंपन्न झाले. ।।४१।।

  तारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलीच्या अंगी सौंदर्याचा नवा बहर आलेला असतो आणि तो स्पष्टपणे दिसू लागतो.  ।।४२।।

  वसंत ऋतूचे आगमन झाले, की बागेतील वनशोभा पूर्वी पेक्षा अधिकच बहरून येते; जणू काही सौंदर्याची खाणच उघडते.  ।।४३।।

  लगडीच्या रुपात सोने पाहीले, तर त्याचे सौंदर्य सर्वसाधारण वाटते; परंतु त्या सोन्याच्या विविध कलाकुसरीचे दागिने बनविले, तर त्या सोन्याचे सौंदर्य विशेष रुपाने खुलून दिसते.  ।।४४।।

  महर्षी व्यासांच्या तेजस्वी बुद्धीतून प्रगटलेल्या विषयामध्ये सत्य, शिव आणि सुंदरतेचे दर्शन होते, हे पाहून जगातील अनेक इतिहासकारांनी महाभारताचा आश्रय केला आहे.  ।।४५।।

  आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरुपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली.  ।।४६।।

  म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही, ते तिन्ही लोकांमध्ये नाही. महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले, त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला. 'व्यासोंच्छिष्ट जगतत्रय' असे म्हणतात.  ।।४७।।

  अशी ही जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे. ही कथा जनमेजय राजाला वैंशपायन ऋषींनी सांगितली.।।४८।।

  श्रोते हो ! ही कथा एकाग्रतेने श्रवण करा. हे महाभारत अद्वितीय,उत्तम,अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परम स्थान आहे.  ।।४९।।

  महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रुपाने सांगितलेली गीता जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे.  ।।५०।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ५१ ते ६०* 🌹
   

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁


*ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि ।*
*निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥ ५१ ॥*

मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें ।
पद आलें परिपाकें । आमोदासी ॥ ५२ ॥

जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं ।
सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥ ५३ ॥

जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं ।
तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥ ५४ ॥

जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे ।
जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥ ५५ ॥

जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे ।
ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥ ५६ ॥

तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा ।
अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥ ५७ ॥

हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे ।
बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥ ५८ ॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥ ५९ ॥

कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां ।
हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥ ६० ॥
     
       🍁 *मराठी अर्थ*🍁

     महर्षी व्यासांनी आपल्या प्रखर बुध्दीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून महाभारतरूपी अनुपमेय नवनीत काढले.  ।।५१।।

  मग ते नवनीत ज्ञानरुप अग्नीच्या संबंधाने विवेकपूर्वक घडविले; आणि त्याचा उत्तम परिपाक होऊन त्या लोण्याचे सुगंधी साजूक तूप झाले, ते म्हणजे *गीता* होय. ।।५२।।

  वैराग्यवान देखील या गीतेची इच्छा करतात. संतदेखील नेहमी या गीतेचा अनुभव घेतात. *'तो परमात्मा मी आहे'* अशा अभेद भावात असणारे ब्रम्हनिष्टदेखील या गीतेत रममाण होतात.  ।।५३।।

  भक्त जिचे परम श्रद्धेने श्रवण करतात, जी त्रैलोक्यात प्रथम वंदनीय आहे, जी भीष्मपर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगितली आहे.  ।।५४।।

  ती " *भगवतगीता*" होय. ब्रम्हदेव आणि महादेव तिची स्तुती करतात, सनकादिक परम श्रद्धेने तिचे श्रवण, मनन, पठण करतात. ।।५५।।

  शरद ऋतूतील चंद्रकलेत असलेले कोवळे अमृतकण चकोर पक्षांची पिल्ले जसे अतिशय मृदू मनाने वेचतात.  ।।५६।।

  त्या प्रमाणे श्रोत्यांने चित्त शुद्ध करून एकाग्रतेने, अत्यन्त हळुवार पणे *भगवदगीतेचा*अनुभव घ्यावा.  ।।५७।।

 शब्दांशिवाय या गीतेच्या अर्थाची मनातल्या मनात चर्चा करावी. इंद्रियांना नकळत याच्या अर्थाचा अनुभव घ्यावा. वक्ताच्या मुखातून शब्द प्रकट होण्यापूर्वीच त्यातील सिद्धांताशी एकरूप होऊन राहावे. ।।५८।।

  ज्या प्रमाणे भ्रमर कमलदलाला समजू न देता त्यातील पराग सेवन करतात, त्याप्रमाणे हा ग्रंथ जाणून घेण्याची पद्धत आहे.  ।।५९।।

  नभामध्ये चंद्रमा उदय पावला, की चंद्रविकासी कुमुदनी प्रफुल्ल होतात आणि आपले पाण्यातील स्थान न सोडता त्याला अलिंगन देण्याचे परमसुख जाणतात. ।।६०।।

*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺

No comments:

Post a Comment