Translate

Friday, February 22, 2019

卐ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका卐=अध्याय १ला :- अर्जुनविषादयोगः-ओवी क्रं-२१ ते ४०

     卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- २१ ते ३०* 🌹
       

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁

*आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी* ।
ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥ २१ ॥

मज हृदयीं सद्‍गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु ।
म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥ २२ ॥

जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे ।
मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥ २३ ॥

कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं ।
तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥ २४ ॥

म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे ।
जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥ २५ ॥

कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं ।
ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥ २६ ॥

तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि ।
जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥ २७ ॥

आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान ।
कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥ २८ ॥

ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि ।
नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥ २९ ॥

कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ ।
शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥ ३० ॥

   🌹 *मराठी अर्थ*🌹

  *(सरस्वती-वंदन)* या नंतर नित्यनूतन प्रतिभा आणि वाणीच्या रुपाने क्रीडा करणारे चातुर्य, अर्थ व कला यांची कामिनी, विविध रस आणि अलंकार युक्त मधुर भाषेद्वारा संपूर्ण विश्वाला मोहित करणारी अशी जी शारदा, तिला मी विनम्र भावाने नमस्कार करतो.  ।।२१।।

  *(सद्गुरु-स्तवन)* श्री सद्गुरूंनी सांगितलेले ज्ञान मी माझ्या हृदयामध्ये साठविले ; त्या मुळे मला भवसागर तरुण जाता आला. म्हणून अंतःकरणातील विवेकावर माझे आत्यंतिक प्रेम आहे.  ।।२२।।

  *ज्या प्रमाणे* पायाळू माणसाच्या डोळ्यात अंजन घातले असता त्याची दृष्टी सर्वत्र पसरते आणि त्याला भूमीमध्ये असणाऱ्या संपत्तीचा ठसा दिसू लागतो.  ।।२३।।

  *मनोकामना* पूर्ण करणारा चिंतामणी हाती आला असता सर्व हेतू पूर्ण होतात, त्या प्रमाणे सद्गुरु निवृत्तीनाथांच्या मूळे मी पूर्णकाम झालो आहे. माझ्या सर्व सदिच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे ज्ञानदेव म्हणतात.  ।।२४।।

  *या साठी* जाणकारांनी सद्गुरुवर परम श्रद्धा ठेवून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे जीवन कृतकृत्य होईल. जसे, झाडाच्या मुळाला पाणी घातले असता फांद्या व पाने सहजच विकसित होतात.  ।।२५।।

  *एका समुद्र* स्नानामुळे त्रैलोक्यांत जेवढी तीर्थे आहेत, त्या सर्वांचे स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते ; किंवा एका अमृत रसाच्या सेवनाने जगातील सर्व रस सेवन केल्या प्रमाणे होते.  ।।२६।।

  *तसे एका सद्गुरूंना* वंदन केले असता, सर्वांना वंदन केल्याचे पुण्य प्राप्त होते ; म्हणून मी वारंवार सद्गुरूंना वंदन करतो, जे सद्गुरु मनातील सर्व सदिच्छा पूर्ण करतात.  ।।२७।।

  *आता सखोल* विचारांची कथा श्रवण करा. ही कथा सर्वांच्या मनात कौतुक उत्पन्न करणारी आहे अथवा विवेकरूपी वृक्षाचे नाविन्यपूर्ण उद्यान आहे.  ।।२८।।

  *ही महाभारतातील* गीता रुपी कथा सर्व मूळ कारण आहे. हे सर्व प्रमुख सिद्धांताचे भांडार आहे किंवा नवरसांनी परिपूर्ण भरलेला अमृताचा सागर आहे.  ।।२९।।

  *किंवा महाभारताच्या* रुपाने मोक्षच प्रगटलेला आहे. हे सर्व विद्यांचे मूळपीठ आहे. जगातील सर्व ज्ञानाचे आश्रयस्थान आहे.  ।।३०।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠


🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💎 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💎
 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः*
  🌹 *ओवी क्रमांक :- ३१ ते ४०* 🌹

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
🍁 🌟 *~_卐_~* *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* *~_卐_~* 🌟🍁

  🍁 *श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ* 🍁

 *ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार* ।
लावण्यरत्‍नभांडार । शारदेचें ॥ ३१ ॥

   नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं ।
आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥ ३२ ॥

म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो ।
एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥ ३३ ॥

तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक ।
आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥ ३४ ॥

एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें ।
आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥ ३५॥

माधुर्यीं मधुरता । श्रुंगारीं सुरेखता ।
रूढपण उचितां । दिसे भलें ॥ ३६ ॥

एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा ।
म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥ ३७ ॥

आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक ।
गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥ ३८ ॥

भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें ।
तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥ ३९ ।।

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें ।
तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥ ४० ॥

         🍁 *मराठीत अर्थ* 🍁

*श्री ज्ञानदेव माउली ३१व्या ओवी च्या प्रारंभी म्हणतात*
  *महाभारत* हे सर्व धर्माचे माहेर आहे, सज्जनांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा विषय आहे; आणि सरस्वतीच्या सौंदर्यरूपी रत्नांचे भांडार आहे. ।।३१।।

  *सरस्वती* महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीत प्रगट होऊन विविध कथेच्या त्रैलोक्यात प्रसारित झाली. ।।३२।।

  *हा महाभारत* ग्रंथ सर्व काव्यग्रंथाचा राजा आहे. या ग्रंथाच्या ठिकाणी महानतेची परिसीमा झाली आहे. या ग्रंथा पासून काव्यातील रसांना रसाळपणाचा डौल आला आहे. ।।३३।।

  *तसेच,* या ग्रंथाचे आणखी महत्व श्रवण करा. महाभारतापासून शब्दरूप संपत्तीला शास्त्रीयता प्राप्त झाली आणि ब्रम्हज्ञानाच्या ठिकाणी कोवळिकता अधिकच वाढली. ।।३४।।

  *या महाभारतात* चातुर्य शहाणे झाले, सिद्धांताना अमृतमय गोडी प्राप्त झाली आणि सुखाचे ऐश्वर्य अधिकच पुष्ट झाले.  ।।३५।।

   *माधुर्याला* मधुरता, शृंगाराला सुरेखपणा आणि योग्य वस्तुंना श्रेष्ठपणा येऊन त्या सर्व उत्तम रीतीने शोभून दिसू लागल्या.  ।।३६।।

  *यातील* कथेपासून कलांना विशेष कौशल्य प्राप्त झाले. पुण्याचा प्रताप वाढू लागला. महाभारताच्या श्रावणाने जनमेजयाचे ब्रम्हहत्येचे दोष नाहीसे झाले.  ।।३७।।

  *सुक्षमबुद्धीने* महाभारताचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, विविध कलांतील गुण त्याने वाढले. या कथेमुळे सद्गुणांचें सामर्थ्य प्रगट झाले.  ।।३८।।

  *सूर्याच्या* तेजाने त्रैलोक्य जसे उजळून निघते, त्या प्रमाणे महर्षी व्यासांच्या विशाल बुद्धीतून निर्माण झालेल्या या कथेमुळे सर्व जगावर ज्ञानाचा प्रकाश पसरला आणि ते शोभून दिसू लागले.  ।।३९।।

  *उत्तम* जमिनीत बी पेरले असता जसा त्याचा सहज विस्तार होत जातो, त्या प्रमाणे महाभारतात सर्व विषय शोभायमान झाले आहेत. ।।४०।।

*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*

💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*
💢💠💢💠💢💠💢💠💢💠💢

     💠🌹 *राम कृष्ण हरी* 🌹 💠

🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺🔅🔺

No comments:

Post a Comment