Translate

Friday, February 22, 2019

ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका 卐अध्याय १ला :- अर्जुनविषादयोगः=ओवी क्र :- ०१ ते २०

*卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💠 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💠
🙏अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः-(ओवी क्रमांक :- ०१ ते १०)
       


👏हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे👏

        卐-श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ-卐

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या*।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा* ॥ १ ॥

देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु ।
म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥

हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष ।
जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥

स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव ।
तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥

अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें ।
पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥ ५ ॥

पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर ।
जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥

देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥

नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी ।
दिसती उचित पदें माझारीं । रत्‍नें भलीं ॥ ८ ॥

तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती ।
चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥

*देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति* ।
*म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥*



     🍁    मराठीत अर्थ   🍁

*(आत्मरूप-वंदन)*अनादीसिद्ध वेदांनी वर्णन केलेल्या , ज्याच्या त्याच्या स्वतः प्रत्येयास येणाऱ्या , विश्वस्वरूप निर्गुण आत्मरूपा , तुझा जयजयकार करून तुला नमस्कार करत आहे .।।1।।

   *(ओंकार रूप गणेश वंदन)* हे देवा ! सर्व विश्वाच्या बुद्धीला प्रकाश देणारा जो गणेश , तो तूच आहेस . निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात , तो गणेश कसा आहे ते अवधानपूर्वक ऐक. ।।2।।

  *संपूर्ण* वेद हीच जणू काही पोषाख केलेली  गणेशाची मूर्ती होय आणि तिच्या ठिकाणी निर्दोष वर्णरूपी शरीराचे सौंदर्य शोभून दिसते आहे.।।3।।

  *मन्वादिकांच्या* स्मुर्ती हे त्याचे अवयव आहते. ते अवयव या स्मुर्तीतील अर्थ-सौंदर्याने जणू लावण्याची केवळ खाणच बनले आहेत. ।।4।।

  *अठरा* पुराणे हे गणपतीच्या अंगावरील रत्नखचित अलंकार आहेत . त्यामध्ये सांगितलेली ही रत्ने; आणि शब्दांची छंदयुक्त रचना ही त्यांची कोंदणे आहेत ।।5।।

  *लालित्यपूर्ण* पदरचना हेच उत्कृष्ट रंगाने रंगविलेले वस्त्र आहे. शब्द-अलंकार आणि अर्थ-अलंकार हे त्या वस्रवरील तेज:पुंज दिसणारे जरीचे तलम तंतू आहेत.।।6।।

  *काव्य* आणि नाटक यांचा कौतुकाने विचार केला आसता, त्या गणपतीच्या पायातील रूणझुंणाऱ्या छोट्या-छोटया घागऱ्या आहेत अर्थ हा त्या घागऱ्यांना  बसविलेल्या घुंगराचा मंजूळ असा ध्वनी आहे.।।7।।

  *व्यास*,वाल्मिकी ,भरतमुनी यांच्या काव्य नाटकातील विविध सिद्धांताच्या शब्दांचा एकाग्रतेने अभ्यास केला , तर त्यात कवीचे अलौकिक कौशल्य दिसून येते . अशी ही  अनमोल शब्द-घागऱ्यांतील उत्तमोत्तम रत्ने आहेत ।।8।।

  *महर्षी* व्यासादिकांची बुद्धी ही गणपतीची मेखला म्हणजे कटिभूषण होय. त्याला लोंबत असलेल्या मोत्यांच्या पदरातील घोष हे त्या बुद्धीतील शुद्धत्व सात्विकपणे झळकत आहे.।।9।।

  *गणपतीचे* सहा हात ही सहा शास्त्रे होत ; म्हणून त्यांतील विविध प्रकारचा अभिप्राय ही त्या त्या हातातील वेगवेगळी शस्त्रे होत.।।10।।


*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

*卐 ॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥* *卐*
  💠 *॥ ॐ श्रीगणेशाय नमः॥* 💠
💢 *अध्याय पहिला :- अर्जुनविषादयोगः* 💢
  🌹 *ओवी क्रमांक :- ११ ते २०* 🌹
     
*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे

卐-श्री ज्ञानेश्वरी प्रारंभ-卐

तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु ।
वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥

एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु ।
तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥

मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु ।
धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥

देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु ।
जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥

 तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु ।
देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥

मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं ।
बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसेपणें एकवटत इभ- । मस्तकावरी ॥ १७ ॥

उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे ।
तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥ १८ ॥

अकार चरण युगल । उकार उदर विशाल ।
मकार महामंडल । मस्तकाकारें ॥ १९ ॥

हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें ।
तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥ २० ॥


🌺🌹 *मराठी अर्थ*  🌹🌺

  *न्याय* दर्शनातील सोळा पदार्थांचे विश्लेषण करणारा तर्क म्हणजे गणपतीच्या हातातील परशू होय. वैशेषिक दर्शनातील सात पदार्थांचा सिद्धांतभेद हा दुसऱ्या हातातील अंकुश आहे आणि उत्तरमीमांसा दर्शनातील ब्रम्हस्वरूप सिद्धांत हा गणपतीच्या हातातील अमृतमधुर मोदक होय.   ।।११।।

  *वार्तिककरांनी* सांगितलेले आणि स्वभावतःच खंडीत झालेले जी बौद्ध मत आहे, ते एका हातात असणाऱ्या खंडित दाताच्या ठिकाणी शोभते.  ।।१२।।

  *सत्कारवाद* हा गणपतीचा वर देणारा कामलासमान हात होय. हा धर्माची सिद्धी करतो आणि हा अभय देणारा हात आहे.  ।।१३।।

  *गणपतीच्या* ठिकाणी ब्रम्हानंद ही सरळ, निर्मळ आणि चांगले व वाईट याची निवड करण्यास समर्थ अशी सोंड आहे.  ।।१४।।

  *गुरू-शिष्याचा* हा सुखसवांद म्हणजे गणपतीच्या मुखतील दात असून ब्रम्हज्ञान प्राप्त झाल्यानंतर सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्माण होणारी समता हा त्या दातांचा पांढरा रंग होय. ज्ञानदृष्टी म्हणजे त्या विघ्नराजाचे सूक्ष्म असे नेत्र होत.  ।।१५।।

  *पूर्वमीमांसा* आणि उत्तरमीमांसा हाच त्या गणपतीच्या कानांच्या ठिकाणी असून बोध हे त्याचे मदरूपी अमृत मुनिरूपी भ्रमर सेवन करतात, असे मला वाटते.  ।।१६।।

  *वेदशास्त्र* पुराणात सिद्धांतरुपाने संगतलेली तत्वे ही गणपतीच्या अंगावरील तेजयुक्त पोवळी होत. द्वैत आणि अद्वैत मते ही मस्तकावरील गंडस्थळे असून सारखे पणाने ती तेथे एकत्र झाली आहेत.  ।।१७।।

  *ज्ञानरूपी* मकरंद ज्या मध्ये परिपूर्ण भरलेला आहे, अशी ईशावास्य इत्यादी दहा उपनिषदे ही जणू सुगंधी फुले असून ती गणपतीच्या मुकुटावर उत्तम तऱ्हेने शोभून दिसत आहेत.  ।।१८।।

  *ओंकाराची* पहिली अकारमात्रा हे गणपतीचे दोन्ही पाय आहेत. दुसरी उकरमात्रा हे त्याचे मोठे पोट आहे. तिसरीमात्रा हा त्याचा मोठ्या वाटोळ्या मस्तकाच्या आकार आहे.  ।।१९।।

  *अकार, उकार, मकार* या तिन्ही मात्रा एकत्रित झाल्या, म्हणजे त्या ओंकारात संपूर्ण वेद संक्षेपाने समाविष्ट होत असतो. त्या बिजरूप ओंकाररूप गणपती देवरायास मी सद्गुरु श्री निवृत्तीनाथ यांच्या कृपेने नमस्कार करतो.  ।।२०।।



*हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे*
    *हरे राम हरे राम राम राम हरे हरे*
*"वासुदेव सुतं देवम् कंस चानुर मर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णम् वंदे जगदगुरुम्।।"*


     🙏🙏🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏

No comments:

Post a Comment