Translate

Monday, September 3, 2018

नाम महिमा ===संत चोखोबा

विवेक पाटिल
vivekanandmpawar@gmail.com

  अभंग =।। संत चोखोबा ।।

सुखा कारणें करी तळमळ ।
जपें सर्वकाळ विठ्‌ठल वाचे ॥१॥

तेणें सर्व सुख होईल अंतरा ।
चुकती वेरझारा जन्ममरण ॥२॥

नलगे वेचावें धनाचिये पेटी ।
धरा नाम कंठीं विठोबाचें ॥३॥

बैसोनी निवांत करावें चिंतन ।
राम कृष्ण नारायण दिननिशीं ॥४॥

चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार ।
नाम एक सार विठोबाचें ॥५॥

           प्रस्तुत अभंग नामपर प्रकरणातील असुन नामाचे महात्म्य    वर्णन करणारा संत चोखोबाराय यांचा पाच चरणांचा आपल्या अज्ञानी जीवाला उपदेश करणारा आहे.
आपण मागील चिंतनात सांगुन गेलो की जगातील प्रत्येक जन हा फक्त सुखासाठीच जगत असतो. परंतु आपण अज्ञानी जीव आभासिक सुखात गुरफटलेलो आहोत म्हणून अवीट सुखापासुन दुरावतो आहे. परंतु अंतःकरणात तळमळ मात्र अवीट सुखाचीच आहे बरं . हे संतमंडळी जाणुन आहेत म्हणुन सर्वच संत मंडळी आपल्या अभंगातून आपल्या अज्ञानी जीवाशी संवाद साधत असुन त्या सुखाचे वर्णन आपल्याला सुख प्राप्ती व्हावी या शुद्ध हेतुने करत असतात. असाच प्रयत्न संत चोखोबांचा सुद्धा आहे. म्हणून महाराज म्हणतात की ज्या सुखासाठी आपण तळमळता आहात तेच सुख वाचेने विठ्ठलाचा अखंड जप केल्यास प्राप्त होते. हेच अभंगाच्या पहील्या चरणात सांगतात.

सुखा कारणे करी तळमळ |
जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे || 1 ||

संत चोखोबाराय म्हणतात बाबांनो आपण ज्या सुखाकरीता तळमळता आहात म्हणजे ज्या अवीट सुखाची प्राप्ती करण्यासाठी दुःखरुपी रानावनात भणभण भटकत आहात. त्याच सुखाचा सर्वात सोपा उपाय सांगतो तो म्हणजे
" जपें सर्वकाळ विठ्ठल वाचे "
आपण अज्ञानी जीवाने पांडुरंग परमात्मा विठ्ठलाचा वाचेने सर्वकाळ जप करावा म्हणजे कोणत्याही कर्माचा त्याग न करता, घरादाराचा त्याग न करता आपल्या कामातच राहुन फक्त वाचेने विठ्ठलाचा जप अखंड , सर्वकाळ करावा. कारण नाम घ्यायला " काळवेळ नाम उच्चारीता नाही " या माऊलींच्या न्यायाने काळावेळाची गरज मुळीच नाही . नाथबाबा सुद्धा आपल्या हरिपाठात सांगतात.
हरि बोला गाता हरि बोला खाता |
सर्व कार्य करीता हरि बोला ||
नाथ बाबा म्हणतात देता , घेता, उठता , बसता, हसता , भांडता, गाता , खाता नव्हे नव्हे सर्वच कामे करीता करीता मुखाने हरिचे , पांडुरंग परमात्मा विठोबाचें नामस्मरण करा म्हणजेच सर्वकाळ विठ्ठलाच्या जप करावा. अशा प्रकारे अखंड, सदासर्वकाळ वाचेने विठ्ठलाचा जप केला असता अंतरंगात सर्व सुखाची प्राप्ती होईल व जन्ममरणाची येरझार चुकविल्या जाईल. हेच अभंगाच्या दुसर्‍या चरणात संत चोखोबाराय सांगतात.

तेणें सर्व सुख होईल अंतरा |
चुकती वेरझारा जन्ममरण || 2 ||

संत चोखोबाराय म्हणतात बाबांनो तुम्ही जर सतत, सदासर्वदा, सर्वकाळ वाचेने विठ्ठल नामाचा जप केला तर आपल्या अंतरंगात सर्व सुखांची प्राप्ती होईल म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन आत्यंतिक सुखाची प्राप्ती होईल . एवढच नाही तर जन्ममरणाची येरझार सुद्धा चुकेल. म्हणजे जन्माला येणे दुःख भोगणे व मरणे ही झाली एक येरझार अशा अनेक येरझारा आतापर्यंत आपण अनेक मारल्या असतील. या बाबत संत तुकोबा म्हणतात.
किती वेळा जन्मा यावे |
किती व्हावे फजिती ||
अशा प्रकारे किती वेळा जन्माला यावे व या ठीकाणी येऊन दुःख भोगून आपणच आपली फजिती करुन घ्यावी . अशा दुःखरुपी जन्ममरणाची येरझार चुकविल्या जाईल. व आत्मानंद, आत्मसुख प्राप्त होईल. या करीता तुम्हाला धन वगैरे काहीही वेचावें लागणार नाही किंवा या सुखाची प्राप्ती करण्यासाठी धनसंपत्तीची मुळीच गरज नसुन फक्त आपल्या कंठात विठोबाचें नाम धारण करा. हेच संत चोखोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात.

नलगे वेचावें धनाचिये पेटी |
धरा नाम कंठीं विठोबाचें || 3 ||

ज्या प्रमाणे संसारात धनाने सर्व काही म्हणजे नोकरी वगैरे किंवा अनेक प्रकारचे पद भोगायला मिळतील नव्हे नव्हे अनेक आभासिक सुख प्राप्त होतील परंतु मनाला खरे समाधान प्राप्त होणार नाही.
त्या प्रमाणे परमार्थात कितीही धनाच्या पेट्याच्या पेट्या जरी प्राप्त केलेल्या असल्या तरी काहीच कामाच्या नाहीत म्हणजे त्या धनाच्या पेट्या देऊन दुःखरुपी जन्ममरणाची येरझार चुकवु शकणार नाही किवा ते आत्यंतिक सुख प्राप्त करण्यासाठी धनाच्या पेट्या जरी असल्या तरी त्या खर्चाव्या लागणार नाहीत तर फक्त त्या पांडुरंग परमात्मा विठोबाचें नाम कंठात धारण करावे लागेल. जसे संसारात एखादी वस्तु प्राप्त करायची असेल तर त्या करीता कष्ट करून मिळवलेले धन खर्चावे लागते त्या प्रमाणे परमार्थात आत्मवस्तुची प्राप्ती करण्याकरीता धन खर्चावे लागत नसुन फक्त कंठात विठोबाचें नाम धरायचे आहे म्हणजे फक्त नामस्मरण करायचे आहे. ते कसे करायचे तर निवांत बसून राम कृष्ण नारायणाचे दररोज चिंतन करावे. हेच अभंगाच्या चौथ्या चरणात संत चोखोबाराय सांगतात.

बैसोनी निवांत करावे चिंतन | राम कृष्ण नारायण दिननिशीं || 4 ||

संत चोखोबाराय म्हणतात बाबांनो निवांत बसुन म्हणजे मनाला भगवंताच्या ठीकाणी स्थिर करुन एकच दिवस सदा सर्वकाळ नाही तर दिननिशीं म्हणजे दररोज सदा सर्वकाळ त्या राम कृष्ण नारायणाचे चिंतन करावे. शेवटी संत चोखोबा म्हणतात की असाच निर्धार करावा कारण या जगात फक्त भगवंताचे , पांडुरंग परमात्मा विठोबाचें नामच एक सार आहे. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात.

चोखा म्हणे ऐसा करावा निर्धार |
नाम एक सार विठोबाचें || 5 ||

संत चोखोबाराय म्हणतात बाबांनो जीवनात परमानंद , आत्यंतिक आनंद , आत्यंतिक सुख प्राप्त करायचे असेल तर वर सांगितल्या प्रमाणे वाचेने विठ्ठलाचा सदासर्वकाळ जप करण्याचा, कंठात विठोबाचें नाम धारण करण्याचा, निवांत बसून भगवंताचे अखंड चिंतन करण्याचा आपल्या अज्ञानी जीवाने पक्का निर्धार ( निश्चय ) करावा.
निश्चयाचे बळ |
तुका म्हणे तेचि फळ ||
कारण त्या भगवंताचे, विठोबाचें नामच फक्त सार आहे बाकी या जगात सर्वच असार आहे. या बाबत संत प्रमाण सुद्धा आहेत .
फलकट तो संसार |
येथ सार भगवंत ||
सार सार सार विठोबा नाम तुझे सार |
म्हणवुनी शुळपाणी जपताहे वारंवार ||
सत्य साच खरे |
नाम विठोबाचें बरे ||
या प्रमाणे विठोबाचें नामच एक सार, सत्य आहे बाकी सर्वच असार, असत्य आहे म्हणून जो परमात्मा सत्य आहे, अविनाशी आहे, सुखरूप आहे. तोच आपल्याला अविनाशी सुखाची प्राप्ती करून देईल. म्हणून त्याच्याच नावाचा जप वाचेने अखंड करावा, त्याचेच नाम कंठात धारण करावे, त्याचेच निवांत बसुन चिंतन करावे असा उपदेश आपल्या अज्ञानी जीवांना संत चोखोबाराय करत आहेत. असे या पामर मनाला वाटते.

                          🙏*रामकृष्णहरि* 🙏
Writer = unknown

No comments:

Post a Comment